धुळे
येथील देवपुरामध्ये शाळेतील शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक महिलेने विष प्रशान करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुख्याध्यापक महिलेला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्यांची तब्येत सध्या गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक मुख्याध्यापक महिलेला अनेक दिवसांपासून त्रास देत होता, त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता. मुख्याध्यापक महिलेने याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार शिक्षकावर कारवाईही करण्यात आली होती. मात्र नंतर तो शिक्षक जामिनीवर सुटला. बाहेर आल्यानंतर त्यानं मुख्याध्यापिकेला जाऊन त्यांना धमकी दिली. “माझं कुणी ही काही करू शकत नाही, मी बाहेर आलो, अब तेरी खैर नही” अशी धमकी दिली. अखेरीस या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक महिलेने विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, भाजपा महिला आघाडीतर्फे आज शाळेत धडक मोर्चा नेण्यात आला होता. ‘इतके घडुनही संस्थाचालक गप्प का? त्यावर कारवाई का केली गेली नाही? असे विचारत महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि शहराच्या माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी संस्था चालकांना जाब विचारला.
जयश्री अहिरराव म्हणाल्या, कालच मुख्याध्यापिकेने माया परदेशी यांची भेट घेऊन सर्व घटनेचे कथन केले. माया परदेशी यांनी त्यांना धीर दिला. त्यानंतर आम्ही संस्थाचालक आणि चेअरमन यांची भेट घ्यायला आलो आहेत. पण चेअरमन झोपी गेले का? अशी शंका येतं आहे. आता त्या शिक्षकावर कठोर कारवाई केल्याशिवाय महिला संघटना गप्प बसणार नाहीत. तसंच असे कुठे ही महिलांवर अत्याचार होत असेल तर आम्हाला न घाबरता सांगावे सांगावे, असं आवाहनही केलं.