पुणे
राज्यात गुन्हेगाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गावातील विद्यमान सरपंचानेच घटस्फोटीत महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून सरपंचाने महिलेवर अतिप्रसंग केला आहे.या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सरपंचावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सरपंच फरार झाला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
रमेश राजुदास चव्हाण (वय वर्ष ३८) असे आरोपी सरपंचाचे नाव आहे. तर, पीडित महिला आर्णी तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ही महिला नवऱ्यापासून विभक्त राहत असल्याची माहिती आहे. सरपंचाने महिलेला निराधार महिलेला राशनकार्ड काढण्यासाठी मदत केली होती. त्यानंतर पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर त्यांच्यात हळूहळू जवळीक वाढत गेली. सरपंचाने त्यानंतर तिच्या मुलांचीही जबाबदारी घेतली.
लग्न होईल या आशेनं पीडित महिला तब्बल दीड वर्ष सरपंचासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. लग्नाचा तगादा महिलेकडून वाढत गेल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. २३ मार्चला त्याने महिलेला मुंबईला पाठवले. नंतर त्याने लग्नासाठी स्थळ पाहणी करण्यास सुरूवात केली. याची माहिती पीडितेला मिळाली. तिने तातडीने त्याला कॉल केला. त्यावेळी सरपंचाने “लग्न तर सोड, तुझ्यासोबत राहण्याचीही इच्छा नाही आणि जर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, तुला ठार मारेन”, अशी धमकीही दिली.यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
तक्रारीत पीडितेने, “सरपंच चव्हाण याने माझा फायदा घेतला आहे. खोटे लग्नाचे आमिष दाखवून त्याने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नंतर धमकीही दिली”, असं तक्रारीत महिलेने म्हटलं आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाआहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी सरपंच फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.