पुणे
जालना जिल्हातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्या करण्यापूर्वी भावी वधुवर बलात्कार झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झालं आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मंठा तालुक्यातील बेलोरा गावात हा सगळा प्रकार घडला आहे. होणाऱ्या पतीने बलात्काराचा प्रयत्न केला, याला विरोध केल्यानेच भावी वधूचा हत्या केली. सुशील पवार असं आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार विवाहाचा मुहुर्त ठरला होता. त्यामुळे दोन्हीकडील मंडळी बस्ता बांधण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजापासून जवळ असलेल्या दुसरबीड या गावात एकत्रित जमले होते.
बस्त्याचा कार्यक्रम सुरु असताना सुनील पवार अचानक गायब झाला होता. सुशीलने थेट बेलोरा गावी जात घरात एकटी असलेल्या भावी पत्नीची भेट घेतली. दरम्यान घरात कुणीच नसल्याची संधी साधत सुशीलने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली.भावी वधूने याला विरोध केला.
यावेळी आरोपीने तिच्यावर बलात्कार करून तिची निर्दयीपणे गळा चिरून हत्या केली आणि तो घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान भावी वधू अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती देखील तपासात उघड झाली आहे.तसेच लग्न ठरण्यापूर्वी आरोपीच्या वडील आणि भाऊ यांनी रोख दीड लाख रुपये,२५ हजारांची सोन्याची अंगठी हुंडा म्हणून घेतल्याची बाबही समोर आली आहे.