अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. राजकीय वैमनस्यातून संरपंचाचं अख्ख कुटुंब संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने घराच्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने आपला जीव वाचवला आहे.
संगमनेरमधील वरुडी गावच्या सरपंचांच्या कुटुंबियांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संरपंचासह कुटूंबीय पहाटे साखरझोपेत असताना दरवाजाला बाहेरून कड्या लावून आग लावण्यात आली होती. सुदैवाने शेजारचे लोक वेळेत पोहचले आणि त्यांनी कुटुंबीयांना वाचवलं.बाबाजी फटांगरे यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडला आहे.
त्यांना मारण्याचा कुणी आणि कशासाठी प्रयत्न केला याबाबत पोलीस तपास करत आहेतमिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास फटांगरे यांच्या घरात अचानक सर्वत्र धूर झाला. मात्र धुरामुळे श्वास गुदमरल्याने घरातील सर्वांना जाग आली. घरात धुराचं साम्राज्य पाहून घरातील मंडळींनी पटकन घराबाहेर पडण्यासाठी धाव घेतला.
मात्र घराचा दरवाजा बाहेरुन लावल्याचं त्यांना समजलं अन् त्यांना धक्का बसला.घरातील धुरामुळे त्यांना शेजाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी फोनही पटकन सापडला नाही. काही वेळात फोन सापडल्यानंतर त्यांनी आजुबाजूच्या नागरिकांना फोन करुन माहिती दिली. शेजाऱ्यांनीही तातडीने घराच्या कड्या उघडल्या आणि फटांगरे कुटुंबीयांना बाहेर घेण्यात आले.
फटांगरे कुटुंबिय बाहेर आल्यानंतर घरासमोरील ठिबकच्या नळ्यांच्या मदतीने अज्ञातांनी घर पेटवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हे कृत्य कुणी आणि का केलं याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र राजकीय विरोधकांनी हे कृत्यं केलं असल्याचा संशय फटांगरे यांनी व्यक्त केला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.