सोलापुर
कामाचे बिल तयार करून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना बार्शी येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागतील शाखा अभियंता आयुब दस्तगीर शेख यांना त्यांच्यात कक्षात एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारीवाडी येथील हनुमान मंदिरास सभामंडपाचे काम ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण करण्यात आले. नंतर या कामाचे बिल मंजूर होण्यासाठी यातील तक्रारदाराने पाठपुरावा करत असताना या कामाचे अंतिम मोजमाप घेऊन त्याचे बिल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी उपअभियंता यांचेकडे सादर करण्यासाठी यातील तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली.
ही लाच रक्कम बांधकाम उपविभाग बार्शी कार्यालयातील शाखा अभियंता कक्षामध्ये स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आयुब शेख हे बार्शी तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी आहेत. येत्या काही दिवसात त्यांचे प्रमोशन होणार होते. मात्र, त्याआधी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले.