पुणे
पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर आगारातील एका एसटी बस महिला वाहकाचा ड्युटीवरच मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. मंदा गुरुनाथ काळे असं मृत महिलेचे नाव आहे.
मंदा काळे अविवाहित असून ही वाडा तालुक्यातील सापने गावच्या रहिवाशी होत्या.त्यांच्या अचानक मृत्युने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, मंदा काळे पालघर आगारात महिला वाहक म्हणून कार्यरत होत्या.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या. पालघर ते सातपाटी अशा दोन फेऱ्या मारल्यानंतर त्यांना पालघर ते कल्याण अशी ड्युटी करायची होती. तत्पूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने विश्रामगृहात त्यांनी थोडासा आराम केला.
मात्र, अचानक मंदा यांच्या प्रकृती खालावली. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोर येथील रुग्णालयात प्राथामिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना सिल्वासा येथे हलवण्याचा सल्ला दिला.
परंतु रुग्णवाहिकेतून नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. आपल्या सहकारी मैत्रिणीच्या निधनाचे वृत्त समजताच तिच्यासोबत काम करणाऱ्या महिला वाहकांनी आपले कर्तव्य बाजूला ठेवून घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.