पुणे
गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. चीनमध्ये तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अक्षरश: कहर केला आहे. या व्हेरिएंटचे ४ रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, भारत सरकारही अलर्ट झालं असून राज्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात आजपासून (२३ डिसेंबर) मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला.परदेशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीनंतर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झालं आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाने केलं आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र भाविकांना अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. दुसरीकडे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी येताना गणेशभक्तांनी मास्क वापरण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तातडीने गणेशभक्तासांठी पाच हजार मास्क खरेदी करण्यात येणार आहेत.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातही आजपासून मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. फक्त कर्मचाऱ्यांसाठी आजपासून मास्क सक्ती करण्यात आली आहे.
भाविकांना मात्र, मास्क सक्ती करण्यात आलेली नाहीये. तरी सुद्धा दर्शनाला येताना मास्क परिधान करू यावे, असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आज मास्कबाबत निर्णय होऊ शकतो. मुंबईतील मुंबा देवी मंदिरातील कर्मचाऱ्यांना तसेच भाविकांनाही मास्क वारण्याच्या सूचना देण्यात आल्यात आहेत.