मुंबई
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण अद्याप तापलेलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ‘केंद्राने पाठवलेल्या या सॅम्पलला पुन्हा बोलवून घ्या किंवा एखाद्या वृद्धाश्रमात पाठवा.
सध्या कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही कल्पनाही करता येत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले, ‘मिंधे सरकारमुळे राज्याची सतत अवहेलना होत आहे.
कोणीही यावं आणि टपली मारून जातो, असं झालं आहे’.’महाराष्ट्राला हिंमत, धमक काहीच नाही का? कोश्यारी यांनी छत्रपत्री शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर मुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. महाराष्ट्राची अवहेलना होत आहे. केंद्रातील सरकार विविध राज्यांमध्ये राज्यपालांची नेमणूक करतं.
मात्र, राज्यपालांची नियुक्ती करताना त्या माणसांची कुवत काय असते हे तपासले जात नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.’केंद्रात ज्यांच सरकार असतं त्यांची किंवा त्यांच्या विचारसरणीची लोकं राज्यपाल म्हणून नियुक्त केले जातात. मात्र आता ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही त्यांना राज्यपालपदी नियुक्त केलं जातंय का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राज्यपाल नियुक्तीचे निकषसुद्धा आता ठरवले पाहिजेत.
राज्यपाल निपक्ष असायला हवेत. राज्यातील पेचप्रसंग सोडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र राज्यपाल जे बोलतात ते गांभीर्याने घेणे गरजेचं आहे. मात्र राज्यपाल काहीही बोलतील हे महाराष्ट्र मान्य करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.