काळूबाई दर्शनासाठी जात असताना भरधाव ट्रकने ठोकरल्याने जागीच मृत्यु;झेंडे कुटुंबावर कोसळला दुखाःचा डोंगर….

काळूबाई दर्शनासाठी जात असताना भरधाव ट्रकने ठोकरल्याने जागीच मृत्यु;झेंडे कुटुंबावर कोसळला दुखाःचा डोंगर….

पुणे

पुणे-सातारा महामार्गावर सारोळे (ता. भोर) येथे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. सहकुटुंब काळूबाई दर्शनासाठी जात असताना बंद पडलेल्या वाहनाकडे रस्ता पार करून पायी जात असताना भरधाव ट्रकने ठोकरल्याने ही घटना घडली.

उत्तम वामन झेंडे (वय ६०, रा. वडकी नाला, ता. हवेली), असे त्यांचे नाव आहे.झेंडे कुटुंबीय शुक्रवारी (ता. २९) सकाळी काळूबाई मांढरदेवी दर्शनासाठी वाई रस्त्याने जाण्यासाठी दोन वाहनांनी निघाले होते. त्यावेळी सकाळी ११ वाजता पुणे-सातारा महामार्गावर सारोळे येथील ‘हॉटेल मल्हार’समोर त्यातील एका वाहनाचा टायर पंक्चर झाला.

यावेळी उत्तम झेंडे हे दुसऱ्या वाहनात पुढे निघून गेले होते. टायर पंक्चर झाल्याचा फोन येताच ते वाहनासह सारोळा उड्डाणपुलाखालून पुन्हा वळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आले. रस्ता ओलांडत पलीकडे असलेल्या वाहनाकडे जात असताना सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकची (क्र. के.ए.२२ ए.ए.४३६३) त्यांना जोराची धडक बसली.

त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांसमोर झालेल्या या अपघाताने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस, महामार्ग पोलिस व आर.टी.ओ. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

अपघातातील ट्रक चालक मुगुटसाहब अब्दुल कादीर जयलानी सय्यद (वय २७) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत अंकुश राजाराम फाटे (वय ३८, रा. वडकी- तळेवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली. याबाबतचा पुढील तपास पोलिस हवालदार नाना मदने करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *