नाशिक
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रदीर्घ काळ सुरू असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात अजूनही एकी कायम आहे.राज्य सरकार आमचे म्हणणे मान्य करत नसेल,तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी,अशी आर्त विनवणी विभागातील २६९ कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्यात गेल्या ६४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अतिशय तुटपुंज्या पगारामुळे नोकरी करावी लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी टोकाचा निर्णय घेत हा संप सुरू केला.
संप पुकारणाऱ्या मुख्य कर्मचारी संघटनेने माघार घेऊनही राज्यभरात ठिकठिकाणच्या बसस्थानकावर आंदोलन करणारे कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर माघार घ्यायला तयार नाहीत.
हे पाहता त्यांच्या व्यथा खरोखर राज्य सरकारने समजून घ्यायची गरज आहे. मात्र, फक्त नोटीसवर नोटीस आणि त्यातही पगारवाढीच्या नावाखाली केलेली किरकोळ वाढ पाहता कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही संताप असल्याचे दिसत आहे.
राज्य सरकार एकीकडे कारवाईची धमकी देते. दुसरीकडे मागण्या मान्य करत नाही. यामुळे कंटाळून जिल्ह्यातील २६९ कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्वेच्छा मरणाची मागणी केली आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानुसार बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे.
त्यात जिल्ह्यातील ३६ कर्मचाऱ्यांना तुम्हाला बडतर्फ करण्यात का येऊ नये?, अशी विचारणा करणाऱ्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. या कारवाईविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.