ओमिक्रॉनचा वेग सर्वाधिक; फेब्रुवारीमध्ये येणार तिसरी लाट, …तर दररोज आढळणार एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण?

ओमिक्रॉनचा वेग सर्वाधिक; फेब्रुवारीमध्ये येणार तिसरी लाट, …तर दररोज आढळणार एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण?

मुंबई

कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने जगभर धुमाकूळ घातला आहे. याची सुरुवात दक्षिण अफ्रिकेमधून झाली होती. मात्र आता भारतामध्ये देखील या विषाणूने शिरकाव केला आहे.

देशासाठी चिंताजनक बातमी म्हणजे देशात ओमिक्रॉन झपाट्याने पसरण्याची शक्यता असून, येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत ओमिक्रॉनने बाधित रुग्ण सर्वोच्च पातळीवर असतील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

फेब्रुवारी महिन्यात देशात दररोज एक ते दीड लाख रुग्ण सापडण्याची शक्यता असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे शास्त्रज्ञ मनिंद्र अग्रवाल यांनी म्हटले आहे.

अग्रवाल यांनी पुढे बोलताना म्हटले की, सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचा अभ्यास सुरू आहे. आमच्या अंदाजानुसार येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. मात्र तोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट सौम्य झालेली असेल.

कोरोनाचा हा नवा विषाणू कोरोनाच्या डेल्टापेक्षा कमी घातक असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. दक्षिण अफ्रिकेमध्ये ओमिक्रॉनचा कसा प्रसार होतो, याकडे आमचे लक्ष असून त्यानुसार भारतामध्ये त्याच्या प्रसाराचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू  यासारखे प्रतिबंध करण्यात आले होते. त्याच पद्धतीच्या उपाययोजनांची पुन्हा एकदा अंमलबजावणी करावी लागेल, तरच आपण ओमिक्रॉनच्या प्रसाराला रोखू शकतो.

ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग हा कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा कितीतरी पेटीने अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, हात स्वच्छ धुवावेत, मास्कचा नियमित वापर करावा,  सॅनिटायझर वापरावे असे आवाहन देखील अग्रवाल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *