पुणे
पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला.विशेष म्हणजे, तनिषा या विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, तनिषा भिसे यांना प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्याने त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी २० लाख रुपयांचा खर्च सांगितला आणि त्यातील १० लाख रुपये तातडीने भरण्याची अट घातली. कुटुंबीयांनी तत्काळ ३ लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, तसेच उर्वरित रक्कम काही वेळाने भरण्याचं आश्वासन दिलं. मात्र, रुग्णालयाने पूर्ण रक्कम भरण्याच्या मागणीवर ठाम राहत, आर्थिक ऐपत नसेल तर ससून रुग्णालयात जावं, असा सल्ला दिला.
या सगळ्या तणावाचा मानसिक परिणाम तनिषा भिसे यांच्यावर झाला. शेवटी नातेवाईकांनी त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवलं. तिथे त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला, मात्र काही वेळानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने आणखी एका रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. तिथे उपचार सुरू असतानाच तनिषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तनिषा यांचा योग्य वेळी उपचार झाला असता तर त्यांचा जीव वाचू शकला असता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी आमदार अमित गोरखे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘पैशांअभावी एका गर्भवती महिलेच्या जीवाशी खेळला गेला, ही आरोग्य व्यवस्थेची अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. या प्रकरणी मी विधान परिषदेत आवाज उठवणार आहे’
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना, ‘आम्ही अंतर्गत चौकशी केली असून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करू. असं सांगितलं.
या प्रकरणानंतर आरोग्य व्यवस्थेतील खासगी रुग्णालयांची मनमानी आणि त्यांच्या व्यापारीकरणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिस आणि आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.