सांगली
जमीन खरेदी केलेल्या खरेदी दस्ताची सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्यांकडून पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना देशिंगचा तलाठी सचिन रघुनाथ पाटील (वय ३८) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
त्याचबरोबर कोतवाल आनंदा पाटील याने तक्रारदाराने तलाठ्यास लाच द्यावी यासाठी प्रोत्साहन दिल्याने कोतवाल आनंदा पाटीलला ताब्यात घेतले.
तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीपत्राच्या दस्ताची सातबाऱ्यावर नोंद करून देण्यासाठी देशिंगचे तलाठी सचिन पाटीलने ३० हजार रुपयांची मागणी केली.
त्याची तक्रार एसीबीकडे आल्यानंतर तलाठ्यावर सापळा लावण्यात आला. चर्चेअंती २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तसेच कोतवाल आनंदा पाटील याने तलाठी सचिन पाटील यांना लाच देण्यासाठी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबीच्या सांगली पथकाने देशिंगच्या तलाठ्या विरुद्ध तलाठी कार्यालयात सापळा लावला असता लोकसेवक तलाठी सचिन रघुनाथ पाटील तहसिल कार्यालयाजवळ तक्रादाराकडून २५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.