मुंबई
‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो असून, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचं विधान राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. यावरूनच अनेक नेते त्यांच्यावर टीका करत आहेत.
अशातच शिवसेनेच्या सामना मुखपत्रातूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे.’शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे असे महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचे वैयक्तिक मत आहे.
शिवरायांचा अपमान करणार्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल’, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.’मराठवाडा विद्यापीठातील एका ‘राजकीय’ सोहळ्यात राज्यपालांनी शिवरायांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. हा विषय तूर्त बाजूला ठेवू, पण ‘‘शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत’’ असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला. हे भयंकरच आहे.
महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजप व मिंधे गटाचा पाय त्यांच्याच राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाला आहे’, असा हल्लाबोलही सामनातून करण्यात आला आहे.