लातूर
लातूरच्या रेल्वेस्टेशन परिसरातून एक अजब घटना उघडकीस आली आहे. एका 59 वर्षीय व्यक्तीला थंडी वाजू लागल्याने तो थेट प्लॅटफॉमजवळील रेल्वेरुळावर झोपला. त्याचवेळी लातूर-मुंबई एक्सप्रेस रुळावरून जात होती. ही बाब लक्षात येताच रेल्वेकर्मचाऱ्यांनी रेल्वे थांबवून या व्यक्तीला बाहेर काढलं. विशेष म्हणजे रुळावरून रेल्वे गेल्यानंतरही या व्यक्तीला साधं खरचटलं सुद्धा नाही.
सोनकांबळे पुंडाजी लिंबाजी असं या नशीबवान बहाद्दराचं 59 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. गुरूवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. प्राप्त माहितीनुसार, गुरूवारी रात्री लातूर रेल्वे स्टेशनवर लातुर -मुंबई एक्स्प्रेस गाडी उभी होती. ही गाडी मुंबईकडे जाण्यासाठी सुरू झाली.काही अंतरावर पुढे गेली. त्या वेळी अचानक एक 59 वर्षीय इसम थेट या रेल्वेरुळावर जाऊन झोपला. हे तिथे उपस्थित असलेल्या काही प्रवाशी व रेल्वे कर्मचाऱ्यानी पाहिलं.
त्यांनी तातडीने रेल्वे थांबवून या व्यक्तीला रेल्वेखालून बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे या इसमाला साधं खरचटलंही नव्हतं. नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला असेच म्हणावं लागेल.आश्चर्याची बाब म्हणजे, जेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला रेल्वेरुळावर का झोपला असं विचारलं असता, थंडी वाजू लागली म्हणून गेलो असं अजब उत्तर त्यांनी दिलं. या संपूर्ण प्रकारानंतर परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, या सर्व प्रकारनंतर रेल्वेखाली झोपलेल्या या बहाद्दराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.