अहमदनगर
विधवा महिलांनाही समाजात मानसन्मान मिळावा यासाठी संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा या ग्रामपंचायतीने कांतिकारी पाऊल उचललं आहे. नुकत्याच झालेल्या मासिक सभेत ग्रामपंचायतीने विधवा महिलांच्या पुनर्विवाहास १६ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
असा निर्णय घेऊन आंबीखालसा ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरणासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.दोन वर्षांपूर्वी आंबीखालसा ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली आणि सरपंचपदी बाळासाहेब डोले विराजमान झाले.
त्यांनी गावातील महिलांच्या उन्नतीसाठी आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महिला महासंघामार्फत ३६ बचतगटांची स्थापना केली. त्या माध्यमातून बचतगटांना कर्ज उपलब्ध करून देत पुरक उद्योगांची उभारणी करून दिली आहे.नुकत्याच झालेल्या मासिक सभेत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेत.
ज्या कुटुंबात मुलीचा जन्म होईल तिथे महिला बालकल्याण समितीतर्फे मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी एक हजार रूपये आणि विधवा विवाहास प्रोत्साहनासाठी १६ हजार रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.मागील दोन वर्षात कोरोनामुळे अनेक तरुण विवाहित जोडप्यांचे सहजीवन अडचणीत आले आहे. त्यातच अलीकडच्या काळात विवाहित तरुणांचे व्यसनाधीनतेने आणि अपघाताने मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. मृत्यू झालेल्या तरुणाच्या पश्चात त्याच्या सहचारिणीचे उर्वरीत जीवन हलाखीचे होते. या समस्येला छेद देण्यासाठी विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्याचा हा निर्णय घेतला असल्याचे सरपंच बाळासाहेब ढोले यांनी सांगितलं.