मुंबई
फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तक्रारदाराकडून लाच स्वीकारणाऱ्या दोघा पोलीस अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
या दोन वेगवेगळ्या ट्रॅपमध्ये मीरा रोड येथील पोलीस उपनिरीक्षकांच्या दुकलीने अडीच लाखांची मागणी तक्रारदारांकडे केली होती. या घटनेने खाकी वर्दीला लाचखोरीचा ‘डाग’ लागला आहे.
फसवणुकीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी करुन, तडजोडीअंती अडीच लाख रुपयांची सेटलमेंट करुन अखेर 50 हजारांची लाच स्वीकारणारे मीरा रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले आणि प्रकाश कांबळे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री ताब्यात घेतले. मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती एसीबीने दिली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका तक्रारदाराविरुद्ध शहाबुद्दीन पठाण यांनी फसवणुकीबाबत केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी मीरा रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले करत होते.
त्याच अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यात त्यांना अटक करु नये, यासाठी एकीलवाले यांनी तक्रारदाराकडे तब्बल दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक ‘धूम’ विभागाचे पोलीस निरीक्षक उत्तम माने यांच्या पथकाने ठाण्यातील कोर्टनाका परिसरात असलेल्या पॅव्हेलियन हॉटेलजवळून एकीलवाले याला अटक केली.
तर कांबळे याला मीरा रोड येथील घरातून ताब्यात घेतले. पैसे घेणाऱ्या फरार सुकेश कोटियन उर्फ अण्णा यांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती एसीबीने दिली.