सांगली
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात राजेवाडीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. घशात खाऊ पदार्थ अडकल्याने दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेमुळं तिच्या आई-वडिलांना मानसिक धक्का बसला.
मुलीच्या मृत्यूचं अतीव दु:ख झाल्याने नैराश्यात गेलेल्या दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवलं. राजेवाडी येथील कानबुनाथ मंदिराच्या समोर असलेल्या झाडाला गळफास लावून दाम्पत्याने आत्महत्या केली. करण हेगडे (२८) आणि शीतल हेगडे (२२) अशी मृतांची नावं आहेत. या दुर्देवी घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील राजेवाडी येथील करण हेगडे यांची दोन वर्षाची मुलगी गळ्यामध्ये खाऊ पदार्थ अडकल्याने चार दिवसांपूर्वी मृत पावली होती.
या धक्कादायक घटनेमुळं करण हेगडे आणि शीतल हेगडे यांच्यावर मानसिक परिणाम झाला. त्यानंतर करण आणि शीतलने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.
मुलीच्या मृत्यूच्या दु:खामुळे व्यतीत होऊन आम्ही आत्महत्या करत आहोत. बाळा आम्हीं तुझ्याकडे येत आहोत, असं चिठ्ठीत लिहून दोघांना झाडाला फास लावून आत्महत्या केली.
आमच्या मृत्यूस आम्ही स्वत: जबाबदार असल्याचेही त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. या घटनेची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.