मुंबई
मुंबईतील शिवाजी नगर इथं एक काळीज पिळवटून टाकणारी घटना गुरुवारी घडली. एका 12 वर्षांच्या लहान मुलाला बेस्ट बसनं चिरडलं. या अपघातात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत मुलगा आपल्या वडिलांसाठी चपात्या आणायला हॉटेलमध्ये जात होता. त्यावेळी हा अपघात घडला. या अपघाताने आईवडिलांच्या मनावर मोठा आघात झालाय. ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास गोवंडी इथं घडली.
या अपघातप्रकरणी बेस्ट बस चालकाला अटक करण्यात आली आहे. अपघातातील मृत मुलाचं नाव समीर इद्रीशी आहे. तो आपल्या आईवडिलांसह राहत होता. त्याला एक 14 वर्षांचा मोठा भाऊ आहे. तो कर्नाटकातील एका मदरशामध्ये शिक्षण घेतोय. समीरचे वडील रिक्षा चालक असून त्यांचं नाव रियाझ आहे.
रियाझ यांच्या पत्नीनेच समीरला चपात्या आणण्यासाठी हॉटेलमध्ये पाठवलं होतं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ यांची पत्नी घरी जेवण करत होती. तिने चपात्या सोडून संपूर्ण स्वयंपाक केला होता. चपात्या आणण्यासाठी समीरच्या आईने त्याला हॉटेलात पाठवलं होतं. 90 फिट रोडवर असलेल्या आशियाना हॉटेलातून समीर चपात्या घेऊन परतणार होता.
पण हॉटेलात जाण्याआधीच त्याच्यावर काळानं घातला.घरातून निघाल्यानंतर दहा मिनिटांनीच रियाझ यांना त्यांच्या मित्राने फोन करुन मुलाचा अपघात झाल्याचं सांगितलं. बस डेपोच्या गेट नंबर चार जवळ रियाझला बसने चिरडलं होतं.
रफीक नगर इथं जाणाऱ्या बसने समीरला धडक दिली.या धडकेत समीर दूरवर फेकला गेला. त्यानंतर तो बसखाली आला. अचानक समोर आल्यानं बस चालकाला काय घडलंही हे आधी कळलंच नाही.
पण जेव्हा कुणीतरी बस खाली आलंय, हे लक्षात आलं, तोपर्यंत फार उशिर झाला होता.31 वर्षीय गणेश गुंजाळ बस चालवत होते. या थरारक अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेतील 12 वर्षीय समीरल शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
अखेर डॉक्टरांनी समीरला मृत घोषित केलं. समीरच्या डोक्याला जबर मार लागला होता. आता पोलिसांनी बस चालकाला अटक केली असून पुढील तपास केला जातोय. या घटनेनं शिवाजी नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.