पुरंदर
राष्ट्रवादी कोंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे परिसंवाद यात्रेचं आयोजन केले आहे. पुरंदर तालुक्यात १ मार्च २०२२ रोजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
एकंदरीतच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये मुख्यत: पुरंदर तालुक्यातील दोन प्रमुख नगरपालिका यामध्ये सासवड नगरपालिका व जेजुरी नगरपालिका या दोन नगरपालिकांची निवडणूक येऊ घातली आहे. या सोबतच या पाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका देखील होऊ घातले आहेत.
नुकतच दोनच दिवसापूर्वी सासवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते यांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करा, राष्ट्रवादीची ताकद वाढवा असे म्हटल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी होणार ? की काँग्रेस स्वतंत्र व राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार याबाबतीत चर्चांना उधाण आलं आहे.
एकंदरीतच मागचा सासवड व जेजुरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा अनुभव पाहता सासवड मध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेशी युती केली होती व काँग्रेस जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे लढले होते यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली होती परंतु आत्ताची व मागील पाच वर्षांपूर्वीची राजकीय परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे.
पाच वर्षापूर्वी पुरंदर तालुक्यातील राजकीय परिस्थिती भिन्न होती व आता पाच वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहिलेल आहे आणि सध्या पुरंदर तालुक्यात राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेचा राष्ट्रवादीशी पूर्वी इतक सख्य आहे की नाही या बाबतीत देखील शंका उपस्थित केली जाते आहे .
कारण पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये बऱ्यापैकी सलोख्याचे संबंध होते असे म्हटले जात होते परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा व त्यानंतर झालेली ग्रामपंचायत निवडणूक यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या अनेक ठिकाणी संघर्षही झालेला आहे. याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या एकत्रित आघाडीतून तालुक्याचं विधानसभेच लोकप्रतिनिधीत्व आता काँग्रेसकडे आलेला आहे.
त्यामुळे एकंदरीत शिवसेना एकाकी पडलेले असल्यामुळे काँग्रेस स्वतंत्र व राष्ट्रवादी स्वतंत्र व शिवसेना देखील स्वतंत्र लढते का असा सवाल आता उपस्थित होत असताना अशा पद्धतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वबळाचा नारा बळकट केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर १ मार्चला होणाऱ्या परिसंवाद यात्रेकडे सर्वांच लक्ष लागले आहे. काही राजकीय विश्लेषक व राजकीय अभ्यासक यांच्या मतानुसार १ मार्चला कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळावर लढावे असा नारा देऊ शकतात अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.
या परिसंवाद यात्रेबाबत मोठ्या प्रमाणात तालुक्यात चर्चा रंगलेली आहे. मोठ्या प्रमाणात ही देखील चर्चा आहे की या परिसंवाद यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे आता पुरंदर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने स्वबळावर लढावे असा नारा देऊ शकतात परंतु ह्या फक्त चर्चाच आहेत.