पुणे
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर चांगलीच खळबळ माजली होती. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबईमधील निवासस्थानी संबंधित युवकाने फोन करुन ही धमकी दिली होती.
या बातमीनंतर मुंबईमधील पोलिसांनी सुत्रे हालवत बिहारमधून या आरोपीला ताब्यात घेतले. नारायण कुमार सोनी नामक हा आरोपी गेल्या चार – पाच महिन्यांपासून सिल्वर ओकवर फोन करुन धमकी देत होता. या प्रकरणात आता नारायण कुमार सोनी याच्याविरोधात पोलिसांनी कलम 294, 506 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. नारायण कुमार सोनीला अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत या आरोपीने अजब खुलासा केला आहे. नारायण कुमार सोनी हा गेल्या १० वर्षांपासून पुण्यात राहत होता. पुण्यात वास्तव्यास असतानाच या युवकाच्या पत्नीने त्याला सोडून दुसऱ्या पुरूषासोबत लग्न केले आणि त्याच्यासोबत राहू लागली.

संबंधित युवकाने या बद्दलची तक्रार दाखल केली होती. मात्र शरद पवारांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळेच आपण त्यांना धमकीचे फोन केले असे या व्यक्तीने सांगितले आहे.
दरम्यान, शरद पवारांना धमकी देणारा नारायण कुमार सोनी हा तरुण मनोरुग्ण असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याने शरद पवार यांना याआधीही धमकी दिली होती त्यावेळी त्याला समज देवून सोडून देण्यात आले होते.