पुणे
पुणेकरांसाठी आजचा दिवस काहीसा टेंशन देणारा असू शकतो. सीएनजी गाड्या वापरणाऱ्यांना आज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण आज २७ जानेवारी रोजी पुण्यातील सीएनजी पंपचालक मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.सीएनजी पंप चालकांचा हा संप अनिश्चित काळासाठी सुरू राहणार आहे. या संपामुळे सीएनजी वाहन चालकांना सीएनजी उपलब्ध होणार नाही. टोरंट कंपनीने नफ्याचे वाटप न केल्याने पंप चालकांनी संपाची घोषणा केली आहे. टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची देखील पंपचालकांची मागणी आहे.पेट्रोल डिझेल डीलर्स असोसिएशननं याआधीही बंद पुकारला होता. मात्र मध्यस्थी नंतर संप मागे घेण्यात आला. त्यानंतरही टोरंट कंपनीकडून शब्द पाळला गेला नसल्याने पंप चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. या संपामुळे पुण्याच्या ग्रामीण भागात वाहनांना सीएनजी उपलब्ध होणार नाही.
पुणे शहरात महानगर नॅचरल गॅस लिमिटेड च्या सेवा पुणे शहरात सुरू राहतील. मात्र टोरेंट कंपनीच्या डीलर्सनी सीएनजीची खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने 1 नोव्हेंबर 2021 रोजी CNG विक्रीतून नफ्याच्या वितरणाबाबत सुधारित यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतरही टोरंट कंपनीने एक रुपयाचीही वाढ केली नाही. त्यामुळे पंपचालक आणि डीलर्सना संपावर जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील CNG पंप चालकांनी बेमुदत संप पुकारल्याचे सांगण्यात आले याचा थेट परिणाम सामान्य वाहतुकीवर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र पुणे ग्रामीणमधील सर्व CNG पंप सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.