कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सरकारी कार्यक्रमात तक्रार करणाऱ्या एका सामान्य महिलेला भाजपाच्या मंत्र्यानं रागाच्या भरात कानशिलात लगावली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
व्हिडीओ व्हायरल होताच कॉंग्रेसने भाजपला घेरलं आहे.विशेष म्हणजे मंत्र्यानं कानशिलात लगावल्यानंतरही या महिलेनं संबंधित मंत्र्याच्या पाया पडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर सत्तेच्या नशेत भाजपच्या मंत्र्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना अरेरावी केली जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, कर्नाटकचे पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही. सोमन्ना चामराजनगर जिल्ह्यातील हंगला गावाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यानिमित्त ते सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत होते. यावेळी एक महिला आपली समस्या घेऊन सोमन्ना यांच्याकडे आली.
या महिलेकडे सोमन्ना यांनी दुर्लक्ष केलं. त्यानंतरही महिलेने आपली समस्या सोडवावी असा आग्रह सोमन्ना यांच्याकडे धरला.महिलेच्या आग्रहामुळे मंत्री व्ही. सोमन्ना इतके चिडले की त्यांनी तिला उघडपणे कानाखाली मारली.
मंत्र्याने कानाखाली मारल्यानंतरही महिला चक्क मंत्री सोमण्णा यांच्या पाया पडून विनवणी करताना दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलझाला.व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर सोमन्ना यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मंत्री व्ही.सोमन्ना यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. महिलांचा सन्मान करण्याचा हा प्रकार आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे.