मुंबई
हॉटेल चालकाकडून मोफत बिर्याणी मागवण्याचा पुणे पोलिसांतील एका पोलीस अधिकाऱ्याचा ऑडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याने मोफत जेवण दिलं नाही म्हणून एका हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.
या प्रकरणात सांताक्रूझमधील वाकोला पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मध्यरात्रीनंतर मोफत जेवण आणि दारू देण्यास हॉटेल कर्मचाऱ्यानं नकार दिला. त्यामुळे वाकोला हॉटेलमध्ये कॅशियरला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरत आहे.
गुरुवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास वाकोला पोलिस ठाण्याजवळील ‘स्वागत’ रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओनुसार, विक्रम पाटील नावाचा अधिकारी कॅशियरकडे जातो. त्याचा शर्ट ओढतो आणि त्याला मारहाण करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दिवसभर रेस्टॉरंटचे स्वयंपाकघर बंद होते. त्यामुळे हॉटेल कर्मचारी त्या पोलीस अधिकाऱ्याला मध्यरात्री साडे बारा वाजता मोफत जेवण देऊ शकला नाही. त्यामुळे संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याने हॉटेल कर्मचाऱ्याच्या अंगावर जात त्याला मारहाण केली.
याबाबत वाकोला पोलीस ठाण्यात विक्रम पाटील यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. तशी माहिती असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंटचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी दिली आहे.