पुणे
राज्य सरकार, मुख्यमंत्री, पालकमंत्री, कलेक्टर आणि संबंधित प्रशासना सोबत चर्चा करून पुरंदर मध्ये होऊ घातलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ या विषयावर मार्ग काढावा लागेल, महाराष्ट्रभरात अनेक मोठे प्रकल्प झाले यात माझा हात होता.तर हिंजवडी, मगरपट्टा व रांजणगावच्या प्रकल्पांचा दाखला देत शेतकऱ्यांना कसे विश्वासात घेतले. प्रकल्प पूर्ण केले.
पुरंदर विमानतळाची जागा आमच्या सरकारच्या काळात आम्ही बदलली होती. दुसरी जागा सुपे भागात सुचवण्यात आली होती.परंतु चालू सरकारने ती जागा नामंजूर केली. त्यामुळे आता पुरंदरमध्ये विमानतळ होत आहे. विमानतळ होणार की नाही, याचा निर्णय मी घेऊ शकत नाही, परंतु शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची बाजू सरकार समोर मांडू, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली.
खानवडी (ता. पुरंदर) येथे पुरंदर विमानतळ बाधित गावांच्या बैठकीत त्यांनी बाधित शेतकऱ्यांना आश्वास्त करीत दिलासा दिला.विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी खानवडी येथे महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत विमानतळ बाधित शेतकऱ्यांची संवाद बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
सरकारने विमानतळ बाधित क्षेत्राची मोजणी केली तरी निर्णय हा शेतकरीच घेणार आहे. तर लोकांना उद्ध्वस्त करून कोणताही मार्ग काढला जाणार नाही, याबाबत सरकारला विनंती करून सरकारशी चर्चा करून या प्रश्नावर मार्ग काढण्यात येईल. विमानतळ प्रश्नाबाबत कोणताही पक्ष आणि राजकारण समोर न येता विमानतळ प्रश्नावर आपण एक आहोत. मी शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, अशी भूमिका पवार यांनी यावेळी मांडली आहे.विमातळ बाधित सात गावांतील शेतकऱ्यांनी विविध मागण्या आणि विमानतळाला असलेला विरोध प्रकर्षणाने शरद पवार यांच्यासमोर मांडला आहे.
बाधित गावातील शेतकऱ्यांचे नेतृत्व शरद पवार यांनी करण्याची विनंती यावेळी मांडली. ती विनंती शेतकऱ्यांकडून मान्य केली आहे. शेतकऱ्यांनी मोजणीसाठी संमती दिली असून भूसंपादनाला संमती दिली नाही. असेही ठाम मत शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. स्थानिक भूमिपुत्र तसेच स्थानिक शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य द्या आणि मूळ शेतकऱ्यांना याचा फायदा मिळवून द्या. मोबदल्यात मिळालेल्या भूखंडावर शेतकऱ्याचे नाव म्हणजेच सातबारा शेतकऱ्यांच्या नावावर करा.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विजय कोलते, दत्तात्रय चव्हाण, माणिकराव झेंडे, बबूसाहेब माहूरकर, गणेश होले, संतोष हगवणे, सुनील धिवार, तुषार झुरंगे, जितेंद्र मेमाणे, रवींद्र फुले,अनिल मेमाणे, महादेव टिळेकर, चंद्रकांत फुले, मुरलीधर झुरंगे, शांताराम झुरंगे, सात गावांतील शेतकरी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारशी बोलून चर्चेतून मार्ग काढू. तर याबाबत मागण्या मांडण्यासाठी एक कमिटी स्थापन करू. विमानतळ या विषयावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.