पुरंदर
महिलांनी शिक्षणाबरोबरच आर्थिक साक्षर होणेही गरजेचे आहे, असे मत माळशिरस ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य राजेंद्र गद्रे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती पुरंदर यांच्या वतीने माळशिरस गावामध्ये महिला बचत गट तयार करण्याचे अभियान ५ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत राबविण्यात आले. त्याचा समारोप कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात महिलांचा मेळावा घेऊन संपन्न झाला या वेळी ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यांचेवर गीत सादर करत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. महिलांना बचतीची सवय लागावी, सावकारीतून मुक्तता व्हावी, शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देणे, आर्थिक व्यवहार माहिती व्हावेत यासाठी हे अभियान संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबविले जात आहे.
या वेळी अभियान प्रभाग समन्वयक सागर ढाकणे यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली तसेच महिलांच्या अडचणी समजावून घेत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या अभियानांतर्गत माळशिरस मध्ये अकरा महिला बचत गट स्थापन केले आहेत. ते संपूर्ण काम ज्यांनी जबाबदारीने पार पाडले त्या वर्धा जिल्ह्यातून आलेल्या वर्धीनी ज्योत्स्ना मुळे, देवकन्या बनसोडे, गीता परमाल, कविता भस्मे यांनी आठ दिवस संपूर्ण गाव, वाड्या-वस्त्यांवर महिलांमध्ये जनजागृती करत अभियानाचे महत्व पटवून दिले. या कामात त्यांना आशासेविका निर्मला मोरे, ग्रामपंचायत कर्मचारी दगडु बोरावके, गालिफ शेख, मुनीर शेख यांनी सहकार्य केले.
या वेळी ग्रा. पं. सदस्या रुपाली गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आभार ग्रा.पं. सदस्या अनिसा शेख यांनी केले. ग्रामसेविका सोनाली पवार व ग्रामपंचायत कर्मचारी पल्लवी आबनावे यांनी यशस्वी नियोजन केले.