पुणे
पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील फुरसुंगी उरुळी देवाची, सासवड आणि जेजुरी या तीन नगरपालिकांना नमो उद्यानासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार विजय शिवतारे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे नागरी सुविधांसाठी आमदार शिवतारे यांनी मागणी केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने हा निधी मंजूर केला आहे.
नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत ही तरतूद केलेली असून या निधीतून नगरपालिकांनी उत्कृष्ट उद्यान विकसित करून शहरातील नागरीकांना चांगल्या दर्जाची उद्याने उपलब्ध करून द्यावीत यासाठी राज्य शासनाने नमो उद्यान संकल्पना राबविलेली आहे असेही श्री. शिवतारे म्हणाले.
शिवतारे पुढे म्हणाले, विकसित करण्यात आलेल्या नमो उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा देखील होणार असून तीन उत्कृष्ट उद्यानाला बक्षिसे देण्यात येणार आहेत. पहिल्या येणाऱ्या पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५ कोटींचे बक्षीस शहरातील पायाभूत सुविधांसाठी देण्यात येईल. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाला अनुक्रमे ३ व २ कोटी रुपये देण्यात येतील. या योजनेतून करण्यात येणारी कामे अन्य कोणत्याही योजनेतून अथवा पालिकेच्या उत्पन्नातून करता येणार नाहीत किंवा जुन्या कामांच्या दुरुस्तीवर हा निधी वापरता येणार नाही. सदर प्रकल्पासाठी करण्यात येणारा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे असेही शिवतारे म्हणाले.
ही कामे नगरपरिषदेच्या वतीने कार्यान्वित करण्यात येणार असून ती दर्जेदार करावीत अशा सूचना तीनही पालिकांना शिवतारे यांनी दिलेल्या आहेत.