पुरंदर
वाहतुकीसाठी नेहमीच धोकादायक असलेल्या पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावर रविवार (दि.०९) पुन्हा अपघात झाला.
निरा नजीक पिंपरे (ता.पुरंदर) येथे दोन दुचाकीस समोरासमोर धडकल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी आहेत. याबाबतची माहिती नीरा पोलिसांनी दिली आहे.
पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा ते वाल्हा दरम्यानच्या निरा डावा कालव्यावरील पुलाजवळ दोन दुचाकी समोरा समोर धडकल्या. या अपघातात किरण रामदास धुमाळ (वय २८) रा. जेऊर, ता.पुरंदर) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मावशी मिना कांतीलाल दरेकर (वय ४०) या जखमी झाल्या आहेत.
धुमाळ हे आपल्या एम. एच १२ जे. पी.३९३० या दुचाकीवरून निरा येथून जेऊरकडे निघाले होते. जेजुरी बाजूने मोहन विनायक रोंदळे (वय ३२) व भिमा बाळु मधुकर (वय ३०) रा. शिंदवणे ता.हवेली हे दोघे एम.एच. १२ ए.डी १४९४ दुचाकीवरून भरधाव आले. रोंदळे गाडी चावलत होते. त्यांनी विरुद्ध दिशेला येऊन धुमाळ यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
यामध्ये चौघे ही जखमी झाले. किरण धुमाळ यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. धुमाळे हे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये नोकरीस होते. रविवारची सुट्टी असल्याने ते त्यांची मावशी मिना दरेकर सोबत ऊस लागणीसाठी जेऊरला निघाले होते. यावेळी हा अपघात झाला.