पुरंदर
पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे अजबच प्रकार पाहायला मिळाला.यामुळे पोलिसांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.विहिरीमध्ये मानवी मृत देह शोधणाऱ्या पोलिसांना भलताच हाती लागलं आणि चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बकरीची दोन लहान पिल्ले त्यात आढळून आली.त्यामुळे पोलिसांना कपाळावर हात मारून घ्यायची वेळ आली.
काल शनिवारी कर्नलवाडी येथील एका विहिरी मध्ये एक पोते असल्याची व पोत्यात काहीतरी असल्याची व त्यातून कुबट वास येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.यानंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले.त्यांचे पाठोपाठ पत्रकारही त्या ठिकाणी दाखल झाले. विहीर खोल असल्याने व विहिरीत उतरण्यासाठी जागा नसल्याने हे पोतं बाहेर काढणं पोलिसांसाठी एक आव्हान निर्माण झालं होतं.
त्यातच दिवसभर पाऊस सुरू होता. या पोत्यामध्ये माणसाचा मृतदेह असावा अशी शंका अनेकांनी व्यक्त केली होती. विहीर ही अडचणीच्या ठिकाणी असल्याने घातपाताची शक्यता आणखी बळावली होती. त्यामुळे पोलिसांना ते पोतं बाहेर काढणं आणि खात्री करणे क्रमप्राप्त झालं होतं. जवळजवळ चार तास प्रयत्न केल्यानंतर हे पोतं बाहेर काढण्यात पोलिसांना यश झालं.
यानंतर हे पोते उचकटून त्यामध्ये पहिले असता दोन बकऱ्याची पिल्ले या पोत्यामध्ये आढळून आली आणि पोलिसांनी कपाळावर हात मारून घेतला. मात्र यामध्ये कोणत्याही माणसाचा मृतदेह नसल्याने पोलिसांनी सुस्कारा सोडला आणि आता कोणत्याही तपासाचा झंझट आपल्या मागे लागणार नाही, यामुळे समाधान व्यक्त केले आणि झालेल्या त्रासाबद्दल त्रागा ही व्यक्त केला.