पुरंदर
सातत्याने दुष्काळी समजला जाणारा पुरंदर तालुका पुरंदर उपसा सिंचन योजना व जानाई शिरसाई योजना व येऊ घातलेल्या गुंजवणी प्रकल्पाच्या मुळे आपली नवीन ओळख निर्माण करु पाहत आहे. खरतर घाटमाथ्यावर असणारा हा तालुका पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणूनच ओळखला जायचा. शेती ची प्रत आणि कष्ट करण्याची कुवत असलेला हाडाचा शेतकरी इथे असला तरी पाण्याअभावी त्याचं जीवन आज पर्यंत अत्यंत हालाखीची असंच होतं.
मात्र लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि तत्कालिन युती सरकारच्या सहकार्याने पुरंदर उपसा सिंचन योजना साकार झाली. या योजनेच्या माध्यमातून मुळा-मुठेच्या पात्रातून आलेलं खराब पाणी त्यावर प्रक्रिया करून त्याचा उपयोग शेतीसाठी करण्याचं धोरण राबविण्यात आला .त्यावेळी शरदचंद्रजी पवार साहेब म्हणाले होते की ही योजना खर्चिक आहे मात्र पुरंदरच्या शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी आपण प्रायोगिक तत्त्वावर तिला गती देऊयात.
आज पुरंदरच्या माळराणावर या योजनेचे पाणी पोचल्याने आता पुरंदरचा भाग खऱ्या अर्थाने फळबागा आणि ऊस शेतीने बहरलेला दिसू लागला आहे. परंतु आजही पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावापर्यंत पोहोचवण्यासाठी चाऱ्यांचीच मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे या योजनेच्या मुख्य वितरिके तुन पाईपलाईनद्वारे तळी, बंधारे ओढ्यामध्ये पाणी पोचविल्यास पाण्याची बचतही होईल आणि त्याच बरोबर सर्व शिवारात हे पाणी पोहोचण्यास मदत होईल .या योजनांचे पाणी शेतकऱ्यांना पैसे भरून घ्यावे लागते .त्यामुळे अनेकदा पाणी पुढे जात असताना पुढच्या लोकांची पैसे भरण्याची तयारी असली तरी पाठीमागच्या ओढ्यातील बंधाऱ्यातील लोकांनी पैसे भरले नाही तर प्रामाणिक आणि पाणी घेण्याची इच्छा असलेल्या लोकांचाही नाईलाज होतो आणि पिकांचे नुकसान होत असलेले दिसून येते .
हे सगळं टाळण्यासाठी तलाव फिडींगचा उपयोग करून गरज असेल त्याला व पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल आणि एक प्रकारे सर्वांना शिस्त देखील लागायला मदत होईल .त्यामुळे पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी तलाव, ओढे, तळी यांच्यापर्यंत मुख्य वितरीकेतुन सोडविण्यासाठी तणाव फिडींगची अत्यंत आवश्यकता आहे .
यासंदर्भात आम्ही मध्यंतरी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनाही पत्र दिले आहे त्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना या सर्व योजनांची चांगली माहिती आहे त्याच्यामुळे ते देखील या बाबीला अनुकूल राहतील यात शंका नाही मध्यंतरी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील शेतकऱ्यांसाठी तलाव फीडिंग च्या योजनेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे .
पुरंदर उपसा सिंचन योजने प्रमाणेच जाणारी शिरसाई योजना ही देखील पूर्व पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी व बारामतीच्या जिरायती भागासाठी वरदान ठरत आहे. याही योजनेतून मिळणारे पाणी बंद पाइपद्वारे शेतकऱ्यांना मिळाल्यास ते खऱ्या अर्थाने सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल कारण अनेकदा शेवटच्या टोकाच्या भागातील गावांपर्यंत पाणी पोचविले जात असताना मधेच पाणी फोडण्याचे प्रकार देखील होत असतात .
त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्यात अडचणी येत आहेत .ही योजना देखील पुरंदरच्या पूर्व भागामध्ये बंद पाइपद्वारे आल्यास व मुख्य वितरीकेतून ती तलावांमध्ये पाईप लाईनद्वारेच सोडण्यात आल्यास खऱ्या अर्थाने या योजनेला देखील गती मिळेल त्यामुळे या दोन्ही योजनांचा विचार करून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शासनाने तलाव फिडिंगद्वारे या योजनांचे पाणी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्या त्या तलावांमध्ये, बंधाऱ्यांमध्ये सोडण्याची व्यवस्था केल्यास खऱ्या अर्थाने या योजना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत.
त्या दृष्टिकोनातून शासनाने या योजनांसाठी सहकार्य करण्याची मागणी पुरंदरच्या पूर्व पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात होत आहे यापूर्वी माजी जलसंपदा राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांनीं देखील शेतकऱ्यांना मोठे सहकार्य केले आहे.सध्याचे पुरंदर चे आमदार संजय जगताप यांचेही यासंदर्भात सहकार्य होत आहे.सरकार निश्चितच या मागणीचा विचार करून शेतकरी हिताच्या या बाबींवर प्राधान्याने निर्णय घेईल अशी आशा वाटते.