पुरंदर
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पिसुर्टी येथील रेल्वेगेट आज सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून बुधवारी सकाळी सात पर्यंत रेल्वेच्या कामासंदर्भात बंद राहणार होते. ऐन सणासुदीच्या काळात हा रस्ता बंद होणार असल्याने लोकांना याचा त्रास होणार होता याबाबत बातमी माध्यमातून प्रसिद्द करण्यात आली होती.
याची दखल घेत स्थानिक प्रशासनाने परवाणगी नकारल्याने हे काम आज रद्द झाले असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांचा ४०किलोमीटरचा वळसा टळला आहे.
मागील सहा महिन्यात पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या कामामुळे पिसुर्टी येथील २७ नंबरचे गेट पाच वेळा बंद ठेवण्यात आला होते. पंढरपूरच्या एकादशीच्या आधी दोन दिवस तसेच गणेशोत्सवा आधी दोन दिवस बंद ठेवल्याने प्रवाशांना चाळीस किलोमीटरचा वळसा घालून यावे जावे लागत होते.
यावेळीही रेल्वे प्रशासनाने पुन्हा दसऱ्याचा मुहूर्त साधून दसऱ्याआधी दोन दिवस पालखी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र माध्यमांनी रविवारी याबाबत सडेतोड वृत्त दिल्याने स्थानिक प्रशासनाने रेल्वेला हे काम करण्यास परवानगी न दिल्याने,आज सोमवारी सकाळी सात पासून सुरू होणारे काम सुरू न करता पुढील काळात या कामाचे नियोजन केल्याचे रेल्वे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली आहे.