पुणे
पुढील काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. पुणे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आपलं बळ वाढवण्यास प्रारंभ केलायं.जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणण्याची मोहिमच त्यांनी आखली.
यानुसार पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यश्र जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भूविकास बॅंकेचे माजी अध्यक्ष मुरलीधऱ निंबाळकर यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलायं.जालिंदर कामठे हे भाजप तर मुरलीधऱ निंबाळकर राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. हे दोघेही संघटनेतून तयार झालेले नेते आहेत.
दोघांनीही युवक काँग्रेस संघटनेतून कामगिरी सुरु केली होती. कालांतराने कामठे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या पत्नीसुद्धा जिल्हा परिषदेच्या सभापती होत्या.निंबाळकर यांनी इंदापूरच्या राजकारणात आपले प्रस्थ राखले आहे. दोघांचीही मदत अजिदादांना पुणे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्यानिमित्ताने होऊ शकते.
कामठेंचा कोंढवा भागातही प्रभाव असून त्यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारीसुद्धा केलेली होती. त्यासाठी त्यांनी सहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, मुरलीधर निंबाळकर, आणि जालिंदर कामठे दोघेही दिवंगत नेते रामकृष्ण मोरे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर त्यांनी विविध पदावर आपली छाप उमटवली होती. या दोघांच्या प्रवेशानंतर अजित पवार आणखीन आपले जुने सहकारी पक्षात घेणार का? याची उत्सुकता लागून राहिली आहे.