पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी!!!!मतदानाच्या पूर्वसंध्येला दहशतीचे सावट;जिल्हा परिषदेच्या “या” गटातील राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला

पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी!!!!मतदानाच्या पूर्वसंध्येला दहशतीचे सावट;जिल्हा परिषदेच्या “या” गटातील राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला

पुणे

खेड तालुक्यातील आंबेठाण-पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनीता बुट्टे यांच्या पती व माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांच्यावर धामणी (ता.खेड) येथे शुक्रवारी (दि. ६) रात्री अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात शरद बुट्टे-पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने वासुली फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मतदानाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शरद बुट्टे-पाटील आपल्या एका मित्रासोबत शुक्रवारी रात्री धामणी येथील मित्राकडे जात होते. धामणी गावाकडे जाणारा रस्ता दगड टाकून अडविण्यात आला होता. रस्ता कोणी बंद केला आहे, हे पाहण्यासाठी बुट्टे-पाटील गाडीतून खाली उतरले असता दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली.

या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबत असलेला सहकारीही जखमी झाला आहे. दोघांनाही वासुली फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुट्टे-पाटील यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र डॉक्टरांचे पथक सतत लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आंबेठाण-पाईट परिसरात तणाव निर्माण झाला असून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. जुन्या वादातून किंवा राजकीय कारणातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेमुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *