पुणे
घर सोडून जाण्यास सांगितल्याच्या रागातून आजीचा नातवाने वडिलांच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील मुंढवा येथे घडली आहे. नातवाने अक्षरशः आजीच्या शरीराचे तुकडे करून नदीत टाकल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये उघड झाले. मुंढवा पोलिसांनी कसून चौकशी करीत हा गुन्हा उघडकीस आणत नातवाला व त्याच्या वडिलास अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, उषा गायकवाड (वय ६२, रा. म्हसोबानगर, मुंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर साहिल ऊर्फ गुड्डु संदीप गायकवाड (वय २० रा. म्हसोबानगर, मुंढवा) व संदीप गायकवाड (वय ४२, रा. गुरुकृपा सोसायटी, लक्ष्मी इन्क्लेव्ह, केशवनगर, मुंढवा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.आजी सतत घर सोडून जा, असे सांगत असल्याने साहिलने आजीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने त्याच्या शरीराचे तुकडे करून ते नदीत टाकले, असल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी शीतल मनोज कांबळे (वय ४०, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या भावाचा मुलगा साहिल ऊर्फ गुड्डु संदीप गायकवाड याने फिर्यदीची आई व त्याची आजी हरवल्याची तक्रार मुंढवा पोलीस ठाण्यात मागील महिन्यात दिली होती.
दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांची आई कुठे गेली, याबाबत साहीलकडे वारंवार विचारणा केली, मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. हा सर्व प्रकार त्यांनी मुंढवा पोलिसांना सांगितला. दरम्यान, घरातून बेपत्ता झालेल्या दिव्यांग ज्येष्ठ महिलेचा खून करून शरीराचे तुकडे करून नदीमध्ये टाकल्याचा दाट संशय पोलिसांना आला होता.
त्यादृष्टीने मुंढवा पोलिसांकडून मुंढव्यापासून ते यवतपर्यंतच्या नदीपात्रात शोध घेतला जात होता.या दरम्यान, फिर्यादीने तिचा भाऊ व भावाचा मुलगा साहिल यांच्याविरुद्ध आईचे अपहरण करून तिचे बरे-वाईट केल्याची तक्रार दाखल केली होती. यासंशयावरून पोलिसांनी महिलेच्या नातवाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली.त्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी, पोलीस निरीक्षक अविनाश मराठे, पोलिस अंमलदार संतोष जगताप, राजू कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली. संदीप गायकवाड हा एका राजकीय पक्षाचा शहर पातळीवरील पदाधिकारी असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.