पुणे
दहशत पसरवून दुकानदाराकडे दहीहंडीच्या वर्गणीसाठी बळजबरीपूर्वक पैशाची मागणी करुन, तक्रारदाराच्या दुकानात तोडफोड करणाऱ्या आरोपींना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दहीहंडीची वर्गणी घेण्यासाठी वाकडच्या जय भवानी चौक परिसरामध्ये राहणाऱ्या काही आरोपींनी वाकड येथील स्नॅक्स अँड स्वीट सेंटर या दुकानात जाऊन दुकान मालकाकडे बळजबरीने दहीहंडीसाठी पाचशे रुपयांच्या वर्गणीची मागणी केली होती. मात्र दुकान मालकाने वर्गणी घेणाऱ्या आरोपींना सुरुवातीला शंभर रुपये देऊ केल्याने आरोपीने संतापून दुकानदाराला बेदम मारहाण करुन त्याच्याकडे पाचशे रुपयाची मागणी केली.
दुकानदाराने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी त्याच्या गल्ल्यात दिवसभरातील धंद्यातील व्यवहारात जमा झालेले दहा ते बारा हजार रुपये पळवून त्याच्या दुकानात तोडफोड करत त्याच्याकडे दर महिन्याला हप्त्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात तक्रारदार दुकानदाराने वाकड पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर वाकड पोलिसांनी चार सज्ञान आरोपींना अटक केली आहे. तर तीन विधी संघर्षीत बालकांना सध्या ताब्यात घेतले आहे.
ज्ञानेश्वर उर्फ माऊली दामोदर उपले, मनीष मच्छिंद्रनाथ कदम, यश सतीश रसाळ, आणि प्रसाद सुभाष राऊत या चार आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.