पुणे
दसऱ्यासारख्या सणासुदीच्या दिवशी कोथरूड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. जय भवानी नगरमध्ये एका मुलाने वडिलांचा चाकूने वार करून खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.खून झालेल्या व्यक्तीचे नाव तानाजी पायगुडे असे असून, आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (वय ३३) याला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तानाजी यांची पत्नी सुमन तानाजी पायगुडे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पायगुडे कुटुंब जय भवानी नगर येथील चाळ क्रमांक दोनमध्ये वास्तव्यास आहे. दसऱ्याच्या दिवशी, दुपारी साधारणपणे बारा वाजता सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी वडील तानाजी यांनी त्याला “टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक” असे सांगितले.
यावरून दोघा बापलेकात वाद झाला. रागाच्या भरात सचिन याने वडिलांवर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला. त्याने तानाजी यांच्या तोंडावर आणि गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतले.
त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणाच्या दिवशीच घराघरात आनंदाचे वातावरण असताना जय भवानी नगरमध्ये घडलेल्या या खुनाच्या घटनेने नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.