पुणे
धामणी ता. आंबेगाव येथे घराच्या जागेच्या वादावरून दिराने सख्या भावजयीवर कोयत्याने प्राणघातक वार केले यामध्ये नंदा तानाजी सोनवणे (वय ६० वर्ष ) या गंभीर जखमी झाल्या या प्रकरणी पारगाव कारखाना पोलिसांनी सुरेश धोंडीबा सोनवणे (मुळगाव -धामणी) सध्या रा केडगाव चौफुला ता दौड याला आज रविवारी ताब्यात घेतले आहे.
पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शनिवारी संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नंदा तानाजी सोनवणे घरी असताना त्यांचा दीर सुरेश सोनवणे हा दारु पिवुन येवुन त्यांना शिवीगाळ करून तुमचा एक एकाचा मर्डर करतो अशी धमकी दिली. तेथुन निघुन गेला. त्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी नंदा तानाजी सोनवणे व त्यांचा मुलगा संपत सोनवणे, सुन शीतल संपत सोनवणे , पुजा बाबुराव सोनवणे गेले होते.
कार्यक्रम चालु असताना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नंदा सोनवणे या कार्यक्रमाच्या ठिकाणावरुन जात असताना शिवशंकर दुध डेअरीच्या समोर अचानक सुरेश सोनवणे हा हातात कोयता घेवुन नंदा सोनवणे यांच्यावर धावून आला व तुला आत्ता जिवंत सोडत नाही. तुझा मर्डरच करतो असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याने त्यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दोन्ही हात बचावासाठी पुढे केले असता त्यांच्या दोन्ही हातावर कोयत्याने वार केले.
दोन्ही हातावर गंभीर दुखापत होवुन दोन्ही हात फ्रॅक्चर झाले नंदा सोनवणे सदर ठिकाणावरून जीव वाचविण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला असता त्याने पाठीमागुन कोयत्याने पाठीवर उजवे बाजुस वार करून गंभीर दुखापत केली. त्यांनी आरडाओरडा केला असता मुलगा संपत सुन पुजा व शितल तेथे आले असता सुरेश सोनवणे याने शिवीगाळ करत तुमचा एकएकाचा मर्डर करतो अशी धमकी देवुन कोयता घेवुन पळून गेला.
नंदा सोनवणे यांच्यावर पारगाव येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मंचर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहे.

