पारेषण कंपनी पेक्षा शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन टॉवर लाईनच्या कामाला स्थगिती द्या : विजय शिवतारे

पारेषण कंपनी पेक्षा शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन टॉवर लाईनच्या कामाला स्थगिती द्या : विजय शिवतारे

सासवड

पुरंदर तालुक्यातील साकुर्डे, धालेवाडी, जेजुरी ,कोथळे, मावडी सुपे, भोसले वाडी, आंबळे,पिसर्वे ,राजेवाडी, यासह इतर गावात पारेषण कंपनीच्या वतीने, दंडेलशाही पध्दतीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, शेतकऱ्यांच्या जमिनी मधून, अतिउच्च दाबाच्या टाॅवरलाईनचे काम सुरू आहे, त्या कामाला त्वरित स्थगिती द्या, पारेषण कंपनी पेक्षा, शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष द्या, अशी मागणी माजी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी, उपविभागीय अधिकारी तथा प्रांतसाहेब पुरंदर दौंड ,व उपविभागीय पोलिस अधिकारी भोर विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनात असे म्हटले आहे की, पारेषण कंपनीच्या वतीने, अतिउच्च दाबाच्या टाॅवरलाईनचे काम शेतकऱ्यांच्या जमिनी मधून दंडेलशाही पध्दतीने सुरू आहे, उर्जा विभागाकडील शासन निर्णयानुसार ,आपल्या अध्यक्षतेखालील समितीने मोबदला निश्चित करणे ,तो शेतकऱ्यांना मान्य नसेल तर, त्यावर मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करणे, अशी कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे.

असे असताना केवळ ,पारेषण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांनी ,आपणाकडे अर्ज केला म्हणून आपण शेतकऱ्यांना सदर कामास अडथळा करु नये म्हणून नोटीसा बजावल्या आहेत, असे निदर्शनास येते, जमिन संपादनाबाबत शेतकरी अनभिज्ञ असताना, आपल्या कार्यालयाकडुन सुरू असलेल्या या सुनावण्या बेकायदेशीर व शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरतात, सर्व शेतकऱ्यांना मोबदला व इतर पारदर्शक माहिती देणे आवश्यक असताना , अशाप्रकारे दंडेलशाही करुन काम रेटने चुकीचे आहे.

अनेक गावांत डोंगराकडून किंवा माळरानातुन पर्याय उपलब्ध असताना, शेतजमिनीत मधून लाईन नेहण्याचा हट्ट केला जात आहे. या सर्व बाबीं विचारात घेऊन ,ही कार्यवाही स्थगित करणे आवश्यक आहे, व शेतकऱ्यांनी दिलेल्या पर्यायाची चाचपणी होणे आवश्यक आहे.

अनेक शेतकऱ्यांना पोलीस स्टेशन मार्फत देखील त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे, पारेषण कंपनी पेक्षा शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे, सबब शेतकऱ्यांना मोबदल्या बाबत पारदर्शक माहिती, त्यांनी सुचविलेल्या पर्यायी जमिनी, त्यांचा वरीष्ठ कार्यालयाकडे अपील करण्याचा अधिकार यादृष्टीने सदरची कार्यवाही स्थगित करावी.अशी मागणी माजीमंत्री विजय शिवतारे यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रांतसाहेब पुरंदर दौंड व उपविभागीय पोलिस अधिकारी भोर विभाग सासवड.यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *