अकोला
अकोट मध्ये एका लाचखोर नायब तहसीलदाराला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. हरीश गुरव असे लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे.
वाळूचा व्यवसाय नियमित चालू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून आठ हजाराची लाच स्वीकारण्यात आली होती. ही कारवाई रात्री नगरपालिकेच्या दालनात करण्यात आली.
तहसीलदार हरीश गुरव याच्याकडे अकोट नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा प्रभारही आहे. वाळू व्यवसाय करणाऱ्याला हरीश गुरव याने दहा हजार रुपये हप्ता मागितला. हप्ता दिल्यानंतर कोणतीही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही त्याने दिली होती.
त्यानंतर तडजोडीअंती आठ हजार रुपये हप्ता देण्याचे ठरले होते. मात्र नियमानुसार वाळू वाहतुकीचा व्यवसाय करत असताना आपल्याला लाच देणे शक्य नसल्या कारणाने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पंचासमक्ष पडताळणी केली असता गुरव याने लाच मागितल्याचे समोर आले.
त्यानंतर रात्री पावणेआठ वाजताच्या दरम्यान अकोट नगरपालिकेत सापळा लावण्यात आला आणि यामध्ये तहसीलदार गुरव हा लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आज तहसीलदार याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.