अहमदनगर
महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे. डोक्यावर हत्याराने वार करुन अंगावरील साडीच्या पदरानेच तिचा गळा आवळण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव शिवारात हा प्रकार घडला.
डोक्यावर हत्याराने वार करुन अंगावरील साडीच्या पदरानेच तिचा गळा आवळण्यात आल्याचा आरोप आहे. महिलेची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर केमिकल टाकून तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुरेगाव येथील एका शेतातील जमिनीच्या बांधावर महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना कळवली.
पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक तसेच डॉग स्कॉडला पाचारण करत वरिष्ठांना कल्पना देत पाहणी केली.
या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलिस पाटील महादेव तान्हाजी रोडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी तपास निरीक्षक दुधाळ करत आहेत.