भिवंडी
पत्नीने दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पतीला राग अनावर झाला. त्यानंतर संतप्त पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना भिवंडीतील शांतीनगर परिसरात घडली असून या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपी पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फिरोज शेख असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. तर रुखसाना असे होरपळून मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे.
कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनां मध्ये वाढ होत असतानाच असाच एक कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार भिवंडीतील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबात घडला आहे. आरोपी फिरोज आणि रुखसाना यांचा विवाह 18 वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हापासून तो पत्नीसह राहतो. काही महिन्यापासून त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यातच आरोपी फिरोज याने गुरुवारी आपल्या पत्नीकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती.
त्यावेळी पत्नीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या फिरोज याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नी रुखसानाने तात्काळ अंगावरील आग विझवण्याचा प्रयत्न करत घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र या घटनेत ती गंभीर होरपळून भाजली असल्याने तिला परिसरातील इतर नातेवाईकाच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करत आहेत.