पुणे
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आव्हानांचा डोंगर कोसळला आहे. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह ही गमवावा लागला आहे.राज्यभरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष उभा ठाकला आहे. शिवसेना पक्ष व चिन्ह गमवावा लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर नव्याने उभारी घेण्याचे आवाहन उभं ठाकलं आहे.
राज्यात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या एका रणरागिणीने उद्धव ठाकरेंसाठी देवी मातासमोर शपथ घेतली आहे.आपल्या नेत्याला अडचणीत बघून कल्याण मधील एका महिला कार्यकर्त्याने देवींच्या चरणी अनोखी अशी प्रतिज्ञा केली आहे.जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्ता आशा रसाळ यांनी घेतली.
मंगळवारी कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये देवींच्या चरणी साकडं घालून आशा रसाळ यांनी शपथ घेतली की जोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय संकट संपत नाही, तसेच उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होत नाही तोपर्यंत त्या पायामध्ये चप्पल घालणार नाही.
आशा रसाळ यांनी ही प्रतिज्ञा घेतल्यानंतर राज्यातील महिला वर्ग तसेच जनतेला उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केलं आहे. आपल्याला लवकरात लवकर विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे. शिवसैनिकच नाही तर सामान्य जनतेलाही मी सत्याच्या बाजूने उभे रहावे, असे आवाहन देखील आशा रसाळ यांनी यावेळी केलं आहे.