पुणे
गावात यात्रा असल्याचे दाखवून तडवळ (ता. अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या अधिकारात सोमवारी (ता. २०) शाळेला सुटी दिली. त्यांच्यासह सर्वच शिक्षकांनी सहकारी शिक्षकाच्या सोलापुरातील वास्तुशांती कार्यक्रमाला हजेरी लावल्याची चर्चा सोमवारी दिवसभर पसरली होती.
मात्र, विद्यार्थ्यांनी शाळेला सुटी असल्याचे पालकांना सांगितल्याने त्यांचे हे बिंग फुटले.आधीच प्रतिनियुक्त्यांवरुन अक्कलकोट गटशिक्षणाधिकारी कार्यालय वादग्रस्त ठरले असतानाच हा नवा प्रकार उघडकीस आल्याने पालकांतून संताप व्यक्त होत आहे.तडवळ येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंत व कन्नड माध्यमाचे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत उर्दूचेही वर्ग भरतात. या शाळेत मुख्याध्यापक व १२ शिक्षक कार्यरत आहेत.
“मुख्याध्यापकांच्या अधिकारात वर्षभरात दोन सुट्या घेता येतात. त्या सुट्या मार्चअखेर खर्ची घालाव्या लागतात, असे मुख्याध्यापकांनी मला सांगितले. त्यामुळे मी सुटी घेण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली, पण हा प्रकार मला नंतर समजला आहे:- संजय कोरे, अध्यक्ष, शालेय समिती, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, तडवळ, ता. अक्कलकोट“
या शाळेला सोमवारी सुटी देण्यात आली होती. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत जायला सांगितल्यावर त्यांनी पालकांना आज शाळेला सुटी असल्याचे सांगितले. आज शाळेला मध्येच सुटी कशाची हा पालकांना प्रश्न पडला. हा विषय ग्रामपंचायतीत पोहोचल्यावर गावच्या सरपंचांनी चौकशी केली. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या अधिकारात गावाची यात्रा दाखवून शाळेला सुटी दिल्याची बाब समोर आली.
तसेच एका आदर्श शिक्षकाने सोलापूर शहरात बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीसाठी शाळेचे सर्व शिक्षक सोलापूरला गेल्याचे कळाले.अधिक चौकशीत केंद्रप्रमुखाच्या सल्ल्याने मुख्याध्यापकासह शाळेतील शिक्षकांनी यासाठी गावच्या यात्रेची सुटी देण्याची शक्कल लढविली. शालेय समितीच्या अध्यक्षांना मात्र त्यांनी वेगळेच कारण सांगून त्यांची स्वाक्षरी घेतल्याचीही चर्चा होती.
तर शिक्षकांच्या या प्रकाराबाबत सरपंच, शालेय आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांच्यासह पालकांनी आक्षेप नोंदवला आहे. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.