पुणे
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना एका ग्रामसेविकेवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.गेवराई (जि.बीड) पंचायत समितीच्या सभापतीच्या पतीने छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी अत्याचार केल्याचे समोर आले.
दीपक प्रकाश सुरवसे (रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) असे अत्याचार करणाऱ्याचे नाव असून, त्याच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभापतीच्या पतीने पीडितेवर अत्याचारावेळी अश्लील फोटो व व्हिडिओ काढून, हे प्रकरण उघड केल्यास व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०१९ मध्ये दीपक सुरवसे हा त्या काळी गेवराई पंचायत समितीच्या सभापतीचे पती होता आणि समितीचा कारभार पाहत होता. सप्टेंबर २०२२ मध्ये सुरवसे याने पीडितेला कामाबाबत बोलायचे आहे, असे सांगून छत्रपती संभाजीनगर येथील व्हिट्स हॉटेलात बोलावले.
हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आरोपीने रूममध्ये बोलावून, कामाच्या बहाण्याने अचानक जबरदस्ती केली. महिलेला विरोध केल्यावर नोकरी ठेवायची असेल तर गप्प बस, अशी धमकी देत अत्याचार केला. अत्याचारावेळी आरोपीने पीडितेचे फोटो व व्हिडिओ काढून, हे कोणाला सांगितल्यास ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
नाशिक, नगर येथे नेऊन अत्याचार
या धमकीचा आधार घेत आरोपीने पीडितेला इगतपुरीतील हिरण्य रिसॉर्ट, नाशिक व अहिल्यानगरमधील हॉटेलात नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहे. याशिवाय पीडितेच्या पतीला मारण्याचा कट केल्याचाही आरोप फिर्यादीत आहे.
घटस्फोटासाठी दबाव
आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडले. त्यानंतर ती गारखेडा परिसरात राहत असताना, २ जुलै रोजी आरोपीने तेथे धिंगाणा घातल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.