पुरंदर
छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले पुरंदर (ता पुरंदर) येथे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सोमवार (दि १६) रोजी ११ वाजता साजरा झाला संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अजित घुले, भाजप पुणे शहर उपाध्यक्ष संतोष भरणे यांच्या हस्ते मूर्तीला दही, दूध,पंचामृताने अभिषेक घालण्यात आला कार्यक्रमास राज्यातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने शंभूभक्त उपस्थित होते
शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने किल्ले पुरंदर वरील राज्याभिषेक सोहळ्याचे हे १० वे वर्षे होते सोहळ्याच्या ठिकाणी सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आले छत्रपती संभाजी महाराज सभागृहात फुलांची सजावट, आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती तसेच १० वाजता शंभूराजांची मूर्ती व बुधभूषण हा संभाजी राजांनी लिहिलेला ग्रंथ पालखीमध्ये ठेवून मूर्तीची मिरवणूक, छबिना, ढोल पथक असे पारंपरिक वाद्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली यात मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आले दिवसभरात हजारो शंभू भक्तांनी हजेरी लावली राज्यातील विविध भागातून शंभू प्रेमी या ठिकाणी आले होते किल्ले पुरंदर येथे येणाऱ्या सर्व शंभू भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते दिवसभर आनंदाचे वातावरण होते गडावर संभाजी महाराजांवर व्याख्यान पोवाड्याचे आयोजन केले होते सभागृहामध्ये सर्व गडावरील छायाचित्रे व त्याची माहिती देखील शंभू भक्तांसाठी ठेवण्यात आली होती
यानिमित्ताने शंभूगौरव पुरस्कार उद्योजक बापूसाहेब दगडे पाटील, सामाजिक डॉ विजय गोकुळे, क्रीडा अजिंक्य बालवडकर तसेच उद्योजक रामू शिंदे, सामाजिक प्रकाश देशमुख, क्रीडा वीरा मल्टीस्पोर्ट्स अकादमी यांचा संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अजित घुले, भाजप पुणे शहर उपाध्यक्ष संतोष भरणे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.