पुरंदर
पुरंदर तालुक्यातील गराडे येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युट्यूब वरती व्हिडिओ पाहून म्हशी खरेदी करण गराडे येथील शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले आहे.
यु ट्यूब वरती व्हिडिओ व फोटो पाहून ऑनलाइन म्हशी खरेदीत गराडे येथील शेतकऱ्याची तब्बल १ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याची धक्कादायक घटना घडली असून यासंदर्भात शेखर लक्ष्मण पवार वय 29 वर्षे राहणार गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार फिर्यादी शेखर पवार हे शेतीला जोडधंदा म्हणून दुध व्यवसाय करतात फिर्यादी यांच्याकडे एक म्हैस असून दुसरी म्हैस घेण्यासाठी ते ऑनलाईन युट्युब वर म्हशी शोधत होते. दिनांक १८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास युट्युब वर शोधत असताना त्यांना सोनू कुमार जाट रा. फुलचंद जाट पाट्या की ढाणी, जयरामपुरा जयपुर राजस्थान हे म्हशींची खरेदी-विक्री करत असल्याचे समजले त्यावर त्यांचा मोबाईल नंबर देखील यांना मिळाला फिर्यादी यांनी सोनू कुमार यांना फोन करून विचारले की मला दोन म्हैसान जातीच्या खात्रीशीर म्हशी घ्यायचे आहेत.
त्यावर सोनू कुमार यांनी फिर्यादी यांना मोबाईलवर म्हशीचे दोन व्हिडिओ व फोटो पाठवले फिर्यादी यांनी मोबाईल वर ते अपलोड केले त्यातील दोन म्हशींचे व्हिडीओ व फोटो पाहिल्यानंतर त्यांनी सोनू कुमार यांना फोन करून त्यांच्याकडे दोन म्हैस विकत घेण्याची मागणी केली त्या म्हशींची प्रत्येकी किंमत १ लाख २० हजार रुपये अशी सोनू कुमार यांनी सांगितली व त्या म्हशी विकत घेण्याचे ठरले.
सोनू कुमार यांनी दोन म्हशी (गराडे ता. पुरंदर) येथे वाहतूक करण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी केली ३ हजार रुपये पाठविण्यासाठी सोनू कुमार यांच्या सांगण्यावरून योगेश माकवाना यांचा एचडीएफसी बँकेचा अकाउंट नंबरवर २० मार्च २०२२ रोजी दुपारी २ वा. च्या सुमारास फिर्यादी यांनी पैसे पाठवले व त्यानंतर सोनू कुमार जाट यांनी म्हशी घेऊन येणाऱ्या टेम्पो ड्रायव्हरचा मोबाईल नंबर देखील दिला व त्यावरती संपर्क साधण्यास सांगितलं टेम्पोचालकाला काही पैशांची कमतरता भासल्यास त्याला पैसे पाठवा असे देखील सांगितले त्यानंतर २१ मार्च २०२२ रोजी ११ . ३० वा. सुमारास टेम्पो चालकाने फिर्यादी यांना फोन करुन कळविले की तुमच्या म्हशी घेऊन मालेगाव नाशिक येथे आलो आहे. तुम्ही योगेश माकवाना यांच्या एचडीएफसी बँक खात्यावरती पैसे पाठवल्यानंतरच गाडी पुढे येईल असे सांगितले सोनू कुमार जाट यांना फिर्यादी यांनी फोन करून सांगितले की तुम्ही पाठवलेला ड्रायव्हरने मला पैसे मागितले आहेत.
तेव्हा सोनु कुमार जाट यांनी सांगितले की तुम्ही ड्रायव्हरच्या मागणी प्रमाणे त्याला पैसे पाठवत राहा त्यानंतर फिर्यादी शेखर पवार यांनी योगेश माकवाना याच्या एचडीएफसी बँकेच्या अकाउंट वरती १ लाख ९० हजार रुपये फोन पे , गुगल पे च्या माध्यमातून ऑनलाइन पाठवले सोनू कुमार जाटच्या मोबाईल फोनवरून देखील त्यांनी खात्री केली की पैसे पोचले आहेत.
फिर्यादी यांनी माकवानाच्या अकाउंट वरती १ लाख ९० हजार रुपये पाठवले त्यानंतर तुमच्या म्हशी २४ तासाच्या आत तुमच्या घरी पोहोच होतील तुम्ही काळजी करू नका असे देखील त्यांना सांगण्यात आले, त्यानंतर सोनू कुमार जाट याने रात्री १० वाजता फोन करून २६ हजार रुपयांची मागणी केली त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना सांगितलं की माझ्याकडे आता पैसे शिल्लक नाहीत सोनू कुमार यांनी त्यांना फोनवर कळवले की तुम्ही जर २६ हजार रुपये पाठवले नाही तर तुम्ही दिलेले पैसे व म्हशी तीन महिने होल्ड केले जातील.
तुम्ही दिलेल्या एकही रुपया बुडणार नाही तुम्ही दिलेली रक्कम तीन महिन्यांनी परत मिळेल असे देखील त्यांना सांगण्यात आले मात्र फिर्यादी यांनी दिलेले पैसे व म्हशी होल्ड करण्याचं कारण काय ? असं सोनू कुमार यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की तुम्ही दिलेले पैसे व म्हशी या ॲनिमल इंडियन गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्ट मध्ये जमा केले जातील त्यानंतर फिर्यादी यांनी सोनू कुमार जाट टेम्पो चालक याला अनेक वेळा फोन केला असता सोनू कुमार जाट व टेम्पो वरील चालक यांनी फोन बंद करून ठेवले त्यानंतर फिर्यादी यांना लक्षात आले की त्यांची फसवणूक झाली आहे .
त्यानंतर दि. २० मार्च २०२२ रोजी दुपारी २ ते २१ मार्च २०२२ रोजी रात्री १० वा.या कालावधीत ऑनलाईन म्हैसान जातीच्या म्हशी देतो म्हणून सोनू कुमार जाट व टेम्पो ड्रायव्हर नाव व पत्ता माहीत नाही यांनी संगनमत करून फिर्यादी यांच्याकडून १ लाख ९३ हजार रुपये घेतले व त्यांना म्हशी दिल्या नाहीत फिर्यादी यांची ऑनलाईन फसवणूक केली म्हणून त्यांनी दोन्ही आरोपींविरोधात सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सासवड पोलीस पुढील तपास करीत आहेत