सांगली
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच आहे. सोमय्या यांनी आज बजरंग खरमाटे यांच्या सांगली आणि तासगावमधील मालमत्तांची पाहणी केली. त्यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांची बेनामी संपत्ती खरमाटे यांच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केलाय. आरटीओ अधिकारी खरमाटे हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. या पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्या यांनी खरमाटे यांच्या सांगतीलील मालमत्तांची पाहणी केली आणि पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला थेट इशाराच केलाय.
बजरंग खरमाटे यांची तब्बल 750 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचा पगार 70 हजार आहे. मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी आली? असा सवाल सोमय्या यांनी केलाय. सोन्या, चांदीची दुकानं, प्रथमेश पाईप फॅक्ट्री खरमाटे यांची आहे. प्रथमेश हे खरमाटे यांच्या मुलाचं नाव असून त्याच्या नावानं अनेक उद्योग आहेत. ही संपत्ती कुणाची आहे कळत नाही. अनिल परब यांच्या सचिवाची एवढई संपत्ती कशी? मग मंत्रिमहोदयांची किती असेल? असा सवालही यावेळी सोमय्या यांनी केलाय.
ठाकरे सरकारची लूट, बेनामी कारभारात अजून एक नाव आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे 19 बेनामी बंगले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार हे बेनामी सरकार आहे. ठाकरे यांचं इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, असा इशारा भाजपने दिलाय. आम्ही ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आम्ही घोटाळे केले असतील तर चौकशी करा. अनिल परब प्रकरण आता सुरु आहे, भावना गवळी पुढच्या आठवड्यात आणि जितेंद्र आव्हाड तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्हीही बॅग भरा, असा थेट इशाराच सोमय्या यांनी दिला आहे.
दरम्यान, बजरंग खरमाटे यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात आली. खरमाटे हे दुपारी 12 वाजता चौकशीसाठी हजर झाले. त्यावेळी खरमाटे यांच्याकडे अनेक मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली. खरमाटे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता असल्याचं म्हटलं जातंय.त्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. खरमाटे यांच्याकडील संपत्ती बाबत, त्यांची पत्नी, मुलगा आणि भाऊ यांच्याकडे असलेल्या संपत्तीबाबतही ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ही संपत्ती कशी आली, मालमत्ता किती रुपयांना घेतली, पैसे कुठून आले, याबाबत चौकशी करण्यात आली. त्याच प्रमाणे गृह विभागात ज्या बदल्या होत होत्या त्यात खरमाटे यांची काय भूमिका होती? याबाबतची त्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळतेय.