पुणे
अहो साहेब, मी जिवंत आहे!’ असे ठणकावून सांगितल्यावर साहेब गडबडले आणि मतदार यादीत मृत दाखवलेल्या ८९ वर्षांच्या आजीबाईंना मतदानाचा अधिकार मिळाला. श्रीमती पारूबाई किसन उंद्रे असे आपला हक्क मिळविलेल्या या आजीबाईंचे नाव आहे.
मांजरीखुर्द येथील जिल्हापरिषद शाळेच्या मतदान केंद्र क्रमांक ४३३ मध्ये श्रीमती पारूबाई उंद्रे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपला नातू अभिजित उंद्रे याच्याबरोबर मतदानासाठी गेल्या होत्या.तेथील मतदान अधिकाऱ्यांना त्यांनी आपले ओळखपत्र दाखविले. मात्र, या नावाची व्यक्ती मृत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या वेळी ‘अहो साहेब, मी जिवंत आहे” असे या ८९ वर्षाच्या आजींनी अधिकाऱ्याला ठणकावून सांगितले.आजींनी मतदानाची स्लिप व मतदानाचे ओळखपत्र येथील केंद्रावरील कर्मचाऱ्यांना दाखवले. नीट बघा मी जिवंत आहे.
यादीत तुम्ही मला मृत दाखविले आहे. असे कसे झाले? असे म्हणत मला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, असा अग्रह आजीने लावून धरला. अखेर अधिकाऱ्यांनी आजींचे मतदान करून घेत निर्माण झालेल्या परिस्थितीला पूर्णविराम दिला. आजीलाही आपण मतदानाचे कर्तव्य पार पाडल्याचा आनंद झाला.