पुणे
पेठ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिवलग मित्राच्या पत्नीला अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी दोन आरोपींविरोधात उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पेठचे माजी सरपंच सूरज भालचंद्र चौधरी आणि त्याचा सावकार मित्र राजेश लक्ष्मण चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, आरोपी राजेश चौधरी हा तिच्या पतीचा जवळचा मित्र आहे. राजेशने पीडितेच्या पतीला दिलेल्या ५ ते ६ लाख रुपयांच्या रकमेच्या वसुलीच्या बहाण्याने पीडितेवर दबाव टाकत, तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला गावात बोलावून स्विफ्ट कारमधून लोणीकाळभोर येथील लॉजवर नेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यानंतर भांडगाव येथेही तिच्या इच्छेविरुद्ध पुन्हा संबंध ठेवले गेले. आरोपीने पीडितेच्या खात्यावर ५ ते ६ लाख रुपये टाकले. त्यानंतर पुन्हा ती रक्कम पतीच्या सहीसह मागू लागला. पीडित महिलेने आठ लाख रुपये देऊन फोटो डिलीट करण्याची विनंती केली, मात्र उर्वरित रकमेच्या मागणीसह पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणात दुसरा आरोपी माजी सरपंच सूरज चौधरी यानेही राजेशने काढलेले अश्लील फोटो दाखवण्याची भीती दाखवून पीडितेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी २०२३ ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत हा अत्याचाराचा प्रकार सुरू होता.
तक्रार दिल्यानंतर पीडित महिलेला मारहाण झाल्याचाही प्रकार घडला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सई मटाले करीत आहेत.