ओझर्डे (कदमवाडी) ता.वाई येथील रहिवासी असलेला अभिजीत भिकू कदम या २८ वर्षीय तरुण गेल्या काही वर्षांपासून वाईच्या एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीत नोकरीला होता. कंपनीने लॉकडाऊनचे कारण सांगत तीन महिन्यांपूर्वी त्याला अचानकपणे कामावरून काढले. त्यानंतर आलेल्या नैराश्येत त्याने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दोन दिवसांपूर्वीच चिंधवली ता. वाई येथील महादेव संजय पवार या २७ वर्षीय तरुणानेही बेरोजगारीला कंटाळून रहात्या घराच्या पाठीमागे कृष्णा नदी पात्रालगत असलेल्या बाबळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. कामगार असलेल्या तरुणांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नोकरी नसल्याने आपल्याला कोणीही मुलगी देणार नाही. आई वडिलांचे निधन झाल्याने हा घरामध्ये एकटाच राहत असल्याने नोकरीवरून कमी केल्याची खंत त्याला नेहमीच सतावत होती.